किनवटमध्ये 36 ग्रामपंचायतींमध्ये 28 एप्रिलला मतदान
नांदेड, 13 एप्रिल (हिं.स.) : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला असून तालुक्यातील 36 ग्रामपंचायतींमध्ये 11 थेट सरपंच आणि 79 सदस्य अशा एकूण 90 जागांसाठी 28 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणूक जाहीर होताच
किनवटमध्ये 36 ग्रामपंचायतींमध्ये 28 एप्रिलला मतदान


नांदेड, 13 एप्रिल (हिं.स.) : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला असून तालुक्यातील 36 ग्रामपंचायतींमध्ये 11 थेट सरपंच आणि 79 सदस्य अशा एकूण 90 जागांसाठी 28 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणूक जाहीर होताच संबंधित गावांमध्ये आचारसंहिता लागू झाली असून ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.

जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 15 एप्रिल रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. 17 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. त्यानंतर त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. 28 एप्रिल रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार असून 29 एप्रिल रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

तालुक्यात घोगरवाडी, सक्रू नाईक तांडा, खंबाळा, निराळा तांडा, पिंपळशेंडा यांसह एकूण 11 ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. तसेच घोगरवाडी आणि सक्रू नाईक तांडा येथे प्रत्येकी 7 जागांसाठी मतदान होणार असून टेंभी रायपूर येथे सर्वाधिक 9 जागा रिक्त आहेत. एकूण 32 गावांमध्ये सदस्यपदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असून, प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे अर्ज केल्याची पावती सादर करून निवडणूक लढविण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

---------------------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande