
नाशिक, 13 एप्रिल (हिं.स.)।
महिलांचे लैंगिक शोषण तसेच आर्थिक फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपांखाली अटक करण्यात आलेल्या भोंदू अशोक खरात याला न्यायालयाने ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तिसऱ्या गुन्ह्यात ही कोठडी देण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास करणारे विशेष तपास पथक आता त्याला चौथ्या गुन्ह्यात ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, सरकारी पक्षाने पोलिस कोठडीचीही मागणी केली आहे.
अशोक खरात याच्यावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याचे आरोप आहेत. त्याच्याविरोधात एकूण १६ गुन्हे नोंदवण्यात आले असून, त्यापैकी ८ गुन्हे लैंगिक शोषणाशी संबंधित आहेत. या सर्व प्रकरणांचा सखोल तपास विशेष तपास पथकाकडून सुरू आहे.
आज त्याची पोलिस कोठडी संपल्याने त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी त्याची ओळख पडताळून पाहिली आणि पोलिसांकडून कोणतीही मारहाण झाली आहे का, अशी विचारणा केली. यावर खरातने नकार दिला.
उद्याही कोर्टात हजेरीची शक्यता
संक्षिप्त सुनावणीनंतर न्यायालयाने तिसऱ्या गुन्ह्यात ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर सरकारी पक्षाने या गुन्ह्यातील पोलिस कोठडीचा हक्क कायम ठेवत, त्याला चौथ्या गुन्ह्यात वर्ग करण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने वैद्यकीय तपासणीनंतर त्याचा ताबा घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे तपासणी पूर्ण झाल्यानंतर उद्या पुन्हा त्याला न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता असून, सुनावणी ऑनलाईन पद्धतीनेच होण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV