इंटरनेट अडचणींमुळे अमरावतीतील विद्यार्थी पडताळणी मोहिमेवर परिणाम
अमरावती, 13 एप्रिल (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यात बोगस विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी राबवण्यात आलेली पटपडताळणी मोहीम पहिल्याच दिवशी इंटरनेटच्या अडचणींमुळे बाधित झाली. परिणामी, बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची मोजदाद कागद-पेनच्या साहाय्याने ऑफलाईन
बोगस विद्यार्थी शोध मोहिमेला इंटरनेटचा खोडा: 882 शाळांमध्ये मोहीम ऑफलाईन,


अमरावती, 13 एप्रिल (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यात बोगस विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी राबवण्यात आलेली पटपडताळणी मोहीम पहिल्याच दिवशी इंटरनेटच्या अडचणींमुळे बाधित झाली. परिणामी, बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची मोजदाद कागद-पेनच्या साहाय्याने ऑफलाईन पद्धतीने करावी लागली, ज्यामुळे पडताळणीच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एकूण ९२७ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची मोजदाद करण्याचे नियोजन केले होते. त्यापैकी ८८२ शाळांमध्येच हे काम पूर्ण झाले असून, उर्वरित ४५ शाळांमध्ये पुढील टप्प्यात ही प्रक्रिया पार पडणार आहे. या मोहिमेचे पुढील टप्पे १५ आणि २२ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहेत.

पटपडताळणी मोहिमेसाठी उपशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, लेखाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील शिक्षकांचे पथक तयार करण्यात आले आहे. प्रत्येक शाळेसाठी एक अधिकारी नियुक्त करण्यात आला होता. या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची मोजदाद करून अहवाल ऑनलाईन सादर करणे अपेक्षित होते; मात्र इंटरनेटच्या अडथळ्यामुळे ही प्रक्रिया ऑफलाईन करावी लागली.

दरम्यान, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या परीक्षांमुळे शासनाकडे आधीच नोंदवली गेली आहे. त्यामुळे या मोहिमेत दुसरी ते अकरावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची मोजदाद केली जात आहे.

अमरावती जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि खाजगी संस्थांच्या मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या एकूण २,८७१ शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे ४ लाख ८३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, ६ हजारांहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत.

शाळांना तीन गटांमध्ये विभागून ही पडताळणी मोहीम राबवली जात असून, पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. उर्वरित दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची अचूक संख्या स्पष्ट होणार आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande