
- १२७ कोटींचा उपचार खर्च माफ
बीड, 13 एप्रिल (हिं.स.)।
केंद्र आणि राज्य सरकारच्या आयुष्मान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेने बीड जिल्ह्यातील सामान्यांसाठी संजीवनीचे काम केले आहे. एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या वर्षभरात जिल्ह्यातील ४३ हजार रुग्णांवर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यांचा १२७ कोटींहून अधिक रुपयांचा खर्च माफ झाला आहे. यामध्ये २५ हजारांहून अधिक शेतकरी कुटुंबांचा समावेश असून त्यांना ७२ कोटी रुपयांचा थेट लाभ मिळाला आहे. १ जुलै २०२५ पासून उत्पन्नाची अट रद्द केल्याने सर्व शिधापत्रिकाधारक या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. बीड तालुक्याने उपचारात आघाडी घेतली असून अंबाजोगाई आणि केज तालुक्यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळत असल्याने गरिबांना खाजगी सावकारांच्या दारात जाण्याची गरज उरलेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis