
११ एप्रिल २०२६ पासून आपण महामानव महात्मा जोतीराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे करत आहोत. चौकाचौकांत पुतळ्यांना हार घातले जातील, भाषणांतून त्यांच्या क्रांतीचा गौरव होईल; पण ज्या अंधश्रद्धा आणि कुप्रथांविरुद्ध जोतिबांनी रक्ताचे पाणी केले, त्या आजही आपल्या समाजात अधिक अक्राळविक्राळ रूप धारण करून उभ्या आहेत, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आजच्या आधुनिक, 'डिजिटल' युगातही आपण मानसिक गुलामगिरीतून मुक्त झालो आहोत का?
जोतिबांनी ज्या पुरोहितशाहीच्या मानसिक गुलामगिरीतून बहुजन समाजाला मुक्त करण्याचा प्रयत्न केला, तीच पुरोहितशाही आज सुशिक्षित वर्गाच्या घरात सोफ्यावर बसून पुन्हा पाय पसरत आहे. आजच्या तथाकथित सुशिक्षित वर्गात कर्मकांडांचे पेव फुटले आहे. ज्या महिलांनी सावित्रीबाईंचा वारसा पुढे नेणे अपेक्षित होते, त्यांच्यातच आज 'सावित्रीची प्रेरणा' लुप्त होऊन दांभिक धार्मिक परंपरांचे प्रस्थ वाढले आहे. लग्नांमधील अनाठायी खर्च, ज्योतिष-मुहूर्त, आणि ग्रहांच्या भीतीपोटी केले जाणारे विधी आजही थांबलेले नाहीत. जोतिबांनी 'सत्यशोधक' विचाराने बुद्धीला जे पटेल तेच स्वीकारायला सांगितले होते, पण आज पदव्या घेऊनही आपले मन अंधश्रद्धेच्या काळोखातच वावरत आहे.
स्त्री आणि पुरुष जन्मतःच स्वतंत्र आणि समान अधिकारांचे धनी आहेत, हे जोतिबांचे तत्त्वज्ञान आपण सोयीस्करपणे विसरलो आहोत. आजही देशात बालविवाहाचे प्रमाण २३% असून महाराष्ट्रात ते २२% आहे. ज्या मुलींना शिक्षणाच्या संधी मिळायला हव्या होत्या, त्या आजही कोवळ्या वयात लग्नाच्या बेडीत अडकवल्या जात आहेत. विधवा आणि एकल महिलांच्या जगण्याचे प्रश्न आजही विदारक आहेत. सात कोटींहून अधिक एकल महिलांना आजही संपत्तीच्या हक्कासाठी आणि सन्मानाने जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. ज्या विधवांच्या दुःखासाठी जोतिबांनी 'सूतिकागृह' काढले आणि विधवेचा मुलगा दत्तक घेतला, त्याच विधवांना आजही धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांतून अपमानास्पद वागणूक दिली जाते.
जोतिबांना अपेक्षित होते की शेतकरी आणि कष्टकरी वर्गातून शिक्षक निर्माण व्हावेत, जेणेकरून ते आपल्या समूहाच्या वेदना समजून घेतील. आज बहुजन समाजातील लोक शिकले, मोठ्या पदांवर पोहोचले; पण दुर्दैवाने या शिकलेल्या वर्गाचे 'ब्राह्मणीकरण' झाले आहे. हा वर्ग आता मध्यमवर्गीय मानसिकतेत अडकून आपल्याच मूळ वंचित समूहाच्या प्रश्नांपासून तुटला आहे. आत्मकेंद्रित जगण्यामुळे वंचितांचे लढे कमकुवत झाले असून, 'रोल मॉडेल' म्हणून पुन्हा त्याच जुन्या कर्मकांडी परंपरांचे अनुकरण केले जात आहे.
शिक्षण हे समाजक्रांतीचे पहिले पाऊल होते. पण आजचे शिक्षण वैज्ञानिक संस्कार करण्यात अपयशी ठरत आहे. शाळा-महाविद्यालयांतून केवळ 'नोकर' निर्माण होत आहेत, पण जोतिबांना अपेक्षित असलेला 'सद्विवेक' निर्माण होत नाहीये. शिक्षणातील गळती आजही मोठी असून, गरीब, दलित आणि स्थलांतरित मजुरांच्या मुलांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचत नाहीये. दुसरीकडे, तंत्रशिक्षण केवळ श्रीमंतांच्या आवाक्यात राहिले असून शिक्षणाचे 'खाजगीकरण' हा शोषणाचा नवा मार्ग बनला आहे.
जोतिबांनी ज्या 'निर्मिकाची' कल्पना मांडली होती, ती सर्व मानवांना एकत्र आणण्यासाठी होती. पण आज राजकीय स्वार्थासाठी विविध सण, उत्सव आणि धार्मिक मिरवणुकांचे भांडवल करून समाजात द्वेष पेरला जात आहे. सरकार स्वतः कुंभमेळ्यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांवर अमाप पैसा खर्च करते, पण गरिबांच्या प्राथमिक शिक्षणासाठी तरतूद वाढवताना हात आखडता घेते. नगरसेवक म्हणून जोतिबांनी पाहुण्यांच्या सजावटीवर पैसे उधळण्यास विरोध करून तो पैसा शिक्षणावर खर्च करण्याची मागणी केली होती, पण आजचे लोकप्रतिनिधी ठेकेदारांचे आणि धार्मिक उन्मादाचेच पोषण करताना दिसतात.
जोतिबांच्या २०० व्या जयंतीनिमित्त केवळ त्यांचे पुतळे उभे करणे किंवा त्यांचे गोडवे गाणे पुरेसे नाही. जोपर्यंत आपण आपल्या मनातील अंधश्रद्धांचे 'हेड ऑफिस' उद्ध्वस्त करत नाही, जोपर्यंत आपण धर्माच्या नावाने होणारी लूट थांबवत नाही आणि जोपर्यंत समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या (वंचितांच्या) हक्कासाठी उभे राहत नाही, तोपर्यंत आपण जोतिबांचे वारसदार म्हणवण्यास पात्र नाही. सत्याचा शोध घेण्याची आणि जगाविरुद्ध ठामपणे उभे राहण्याची धमक पुन्हा एकदा मनात निर्माण करणे, हीच या द्विशताब्दी वर्षाची खरी गरज आहे.
- रुपेश कीर, समर्थन, मुंबई
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी