कांदा पीक काढणीला वेग, मात्र भाव नसल्याने शेतकरी चिंतेत
जळगाव, 13 एप्रिल (हिं.स.) अक्षय तृतीयेच्या सणानंतर तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाळी हंगामातील पांढरा आणि लाल कांदा काढणीला वेग आला आहे. हंगाम सध्या मध्यावर असला तरी बागायती क्षेत्रात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली दिसते. परिणामी
कांदा पीक काढणीला वेग, मात्र भाव नसल्याने शेतकरी चिंतेत


जळगाव, 13 एप्रिल (हिं.स.) अक्षय तृतीयेच्या सणानंतर तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाळी हंगामातील पांढरा आणि लाल कांदा काढणीला वेग आला आहे. हंगाम सध्या मध्यावर असला तरी बागायती क्षेत्रात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली दिसते. परिणामी, अनेक ठिकाणी उपटणी आणि खांडणीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. खर्ची रवंजे, रिंगणगाव, पिंप्री खुर्द, वाघळूद, सतखेडा तसेच शहरालगतच्या शिवारात उन्हाळी कांद्याची लागवड विशेषतः अधिक आहे.

काढणी वाढत असताना मजुरांची टंचाई प्रकर्षाने जाणवत आहे. लागवडीपासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांना मजुरांच्या उपलब्धतेचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. उत्पादन मात्र समाधानकारक झाले असले तरी बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे. स्थानिक कांदा बाजारात आतापर्यंत सुमारे १५ ते २० ट्रक माल दाखल झाला असून त्यापैकी १० ते १२ ट्रकांची विक्री झाली आहे. यंदा हवामानाने साथ दिल्यामुळे काही शेतकऱ्यांना प्रति एकर ३३० ते ३८० गोण्या (प्रत्येकी ४० किलो) इतके उत्पादन मिळाले आहे. कांद्याचा आकारही मोठा असून एका किलोमध्ये तीन कांदे मावणे कठीण जाईल, एवढा दर्जेदार माल तयार झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र, एवढ्या चांगल्या उत्पादनानंतरही दर कमी असल्याने समाधानाचा अभाव आहे. खानदेशात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. काही भागात खरीप आणि उशिरा खरीप हंगामातही लागवड केली जाते, तर काही ठिकाणी फक्त उन्हाळी हंगामावर भर दिला जातो. एरंडोल, धरणगाव, चोपडा आणि यावल परिसरात यंदा उत्पादन चांगले झाले आहे. काढणीच्या काळात पावसाची अधूनमधून चिंता निर्माण झाली असली तरी शेतकऱ्यांनी परिस्थितीवर मात करत कामे सुरू ठेवली आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande