
पुणे, 13 एप्रिल (हिं.स.) : माहे मार्च 2026 कालावधीसाठी केरोसीन (रॉकेल) वितरणाबाबत सरकारकडून नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. या निर्देशांनुसार प्रत्येक लाभार्थी कुटुंबास प्रति शिधापत्रिका 3 लिटर केरोसीन देण्यात येणार आहे.
अंत्योदय व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना या योजनेत प्राधान्य देण्यात येईल. उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिकाधारक, शिधापत्रिका नसलेली कुटुंबे (ग्रामपंचायत दाखल्यासह) तसेच स्थलांतरित मजूर यांनाही केरोसीनचे वितरण केले जाणार आहे.
जारी केलेल्या कोट्यानुसार संपूर्ण केरोसीन 45 दिवसांच्या आत उचलणे बंधनकारक राहणार आहे. निर्धारित कालावधीनंतर उर्वरित साठा पुढे नेला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
वितरण प्रक्रिया तेल कंपन्यांचे वितरक, किरकोळ परवानाधारक (रास्तभाव दुकानदार) आणि लाभार्थी अशा टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडून दर निश्चित केले जातील.
तसेच तेल कंपन्यांनी पुरवठा नियमित ठेवावा आणि 85 टक्के केरोसीन पहिल्या पंधरवड्यात उपलब्ध करून द्यावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. तालुका स्तरावर तहसीलदारांच्या देखरेखीखाली वितरण होणार असून, गैरवापर टाळण्यासाठी तहसीलदार, पुरवठा अधिकारी आणि पोलिसांचे संयुक्त तपासणी पथक नियुक्त करण्यात येणार आहे.
केरोसीनचा वापर फक्त घरगुती कारणांसाठीच करावा लागणार असून, भेसळ किंवा अनधिकृत विक्री आढळल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सर्व संबंधित यंत्रणांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु