लातूर-खंडाळीच्या लेकीची एमपीएससी परीक्षेत भरारी; आस्मा शेख यांची 'महसूल सहाय्यक' पदी निवड
लातूर, 13 एप्रिल (हिं.स.)यशासाठी शहरात जाऊन महागडे क्लासेस लावण्याची गरज नसते, तर प्रबळ इच्छाशक्ती आणि अभ्यासातील सातत्य असेल तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही यशाला गवसणी घालू शकतात, हे अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथील कु. आस्मा दस्तगीर शेख यांनी सि
स्पर्धा परीक्षेत यश


लातूर, 13 एप्रिल (हिं.स.)यशासाठी शहरात जाऊन महागडे क्लासेस लावण्याची गरज नसते, तर प्रबळ इच्छाशक्ती आणि अभ्यासातील सातत्य असेल तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही यशाला गवसणी घालू शकतात, हे अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथील कु. आस्मा दस्तगीर शेख यांनी सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत आस्मा यांनी घवघवीत यश संपादन करत 'महसूल सहाय्यक' पदावर आपली मोहोर उमटवली आहे.

जिद्द आणि स्व-अभ्यासाचे मूर्तिमंत उदाहरण आस्मा शेख.... यांचे प्राथमिक शिक्षण खंडाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर येथून ११ वी व १२ वी (विज्ञान) पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी लातूर गाठले, जिथे दयानंद विज्ञान महाविद्यालयातून बी.एससी. (B.Sc.) आणि राजर्षी शाहू महाविद्यालयातून एम.एससी. (M.Sc.) पूर्ण केले.

स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अनेक विद्यार्थी पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांकडे धाव घेतात. मात्र, आस्मा यांनी घरची परिस्थिती आणि ग्रामीण पार्श्वभूमीचा विचार करून कोणतीही खासगी शिकवणी (ट्यूशन) न लावता पूर्णवेळ घरीच राहून स्व-अभ्यासावर (Self-study) भर दिला. त्यांच्या याच जिद्दीमुळे पहिल्याच प्रयत्नात त्यांनी प्रशासकीय सेवेचे द्वार उघडले आहे.

यशाचे श्रेय कुटुंबाच्या पाठबळाला

या यशाबद्दल खंडाळी ग्रामस्थांच्या वतीने आस्मा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्या भावूक झाल्या. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आजोबा नवाजमियाॅं शेख, वडील दस्तगीर शेख आणि आई राशदबी शेख यांना दिले. ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणासाठी अनेकदा अडचणी येतात, पण माझ्या कुटुंबाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि पूर्ण पाठबळ दिले, म्हणूनच मी हे यश मिळवू शकले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

पुढील ध्येय: मोठ्या सनदी पदाचे स्वप्न

महसूल सहाय्यक पदी निवड झाली असली तरी आस्मा यांचे स्वप्न इथेच थांबलेले नाही. हे तर केवळ पहिले पाऊल असून भविष्यात मोठ्या सनदी पदावर (Class-1/2 Officer) विराजमान होऊन लोकसेवा करण्याचा आपला ठाम निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला. त्यांच्या या यशाबद्दल अहमदपूरचे पत्रकार, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि खंडाळी ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे. आस्मा यांचे हे यश आज स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande