
बीड, 13 एप्रिल (हिं.स.) : अ.भा. किसान सभेचे 24 वे जिल्हा अधिवेशन येत्या बुधवार, 15 एप्रिल रोजी सिरसाळा (ता. परळी) येथे संपन्न होणार आहे. या अधिवेशनाला डॉ. अजित नवले, उमेश देशमुख यांच्यासह अनेक शेतकरी नेते उपस्थित राहणार आहेत.
दुष्काळ आणि अतिवृष्टीचा सातत्याने सामना करणाऱ्या बीड जिल्ह्याला संघर्षाची मोठी परंपरा लाभली असून, तीच परंपरा पुढे नेत किसान सभा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देत असल्याचे सांगण्यात आले.
या अधिवेशनात कर्जमाफी, पीकविमा, हमीभाव, ऊस दरवाढ, भूसंपादन प्रक्रिया तसेच शेतकरी विरोधी जागतिक करार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन ठराव पारित केले जाणार आहेत.
शेतीमालाला कायदेशीर हमीभाव मिळावा, पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला आळा बसावा, शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळावी तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत देयके व्याजासह तातडीने देण्यात यावीत, अशा प्रमुख मागण्या या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत.
सिरसाळा येथील अर्जुनेश्वर विद्यालयात होणाऱ्या या अधिवेशनासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बीड जिल्हा किसान सभा आणि परळी तालुका किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis