
अमरावती, 13 एप्रिल (हिं.स.) : छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘लक्ष्मी मुक्ती योजना’ला अमरावती जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत मौजा देऊरवाडा येथील १४ आणि मौजा काजळी येथील १३ अशा एकूण २७ महिलांची नावे सात-बाऱ्यावर सहहिस्सेदार म्हणून नोंदविण्यात आली आहेत.
महिलांचे मालमत्ता हक्क सुरक्षित करण्याच्या उद्देशाने शासनाकडून ही योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पतीच्या नावासोबत पत्नीचे नावही सात-बाऱ्यावर सहहिस्सेदार म्हणून नोंदवले जाते. यापूर्वी अशी नोंद करण्यासाठी खरेदी-वाटणी पत्र किंवा बक्षीस पत्राची आवश्यकता होती; मात्र आता थेट अर्जाद्वारे ही प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.
नुकत्याच शिरजगाव कसबा येथे पार पडलेल्या अभियानात या नोंदी करण्यात आल्या. या उपक्रमामुळे महिलांना मालमत्तेवरील अधिकार मिळविण्यास मोठी मदत होत असल्याचे मानले जात आहे.
या योजनेचा अधिकाधिक लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाकडूनही जनजागृतीवर भर दिला जात आहे.
चांदूरबाजार तालुक्यात हा उपक्रम महिलांसाठी क्रांतिकारक ठरत असून इतर शेतकरी महिलांनीही या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार सोनाली सूर्यवंशी यांनी केले. तहसील, तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयाकडून पूर्ण सहकार्य मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव यांनी सांगितले की, महसूल विभागाकडून या योजनेबाबत व्यापक जनजागृती सुरू असून अधिकाधिक महिलांची नावे सात-बाऱ्यावर समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी