लातूरमध्ये हेल्मेट व सीटबेल्ट वापर सक्तीचा
लातूर, 13 एप्रिल (हिं.स.)। रस्ते अपघातांमध्ये वाढती मृत्यूसंख्या लक्षात घेऊन लातूर जिल्हा पोलीस दलाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून हेल्मेट व सीटबेल्ट वापर सक्तीचा करण्यात आला आहे. या मोहिमेची अंमलबजावणी प्रथम पोलीस यंत्रणेमध्येच करण्यात येणार आह
हेल्मेट सीटबेल्ट सक्ती


लातूर, 13 एप्रिल (हिं.स.)।

रस्ते अपघातांमध्ये वाढती मृत्यूसंख्या लक्षात घेऊन लातूर जिल्हा पोलीस दलाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून हेल्मेट व सीटबेल्ट वापर सक्तीचा करण्यात आला आहे. या मोहिमेची अंमलबजावणी प्रथम पोलीस यंत्रणेमध्येच करण्यात येणार आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये या मोहिमेचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला असून, पोलीस विभागातील सर्व अधिकारी, अंमलदार व कर्मचाऱ्यांसाठी नियमांचे काटेकोर पालन अनिवार्य करण्यात आले आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात रस्ते अपघातांमधील मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. विशेषतः दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर न करणे आणि चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट न लावणे ही अपघातातील मृत्यूची प्रमुख कारणे असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी पोलिसांनी कडक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

या मोहिमेअंतर्गत दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले असून चारचाकी वाहनांमध्ये चालकासह सर्व प्रवाशांनी सीटबेल्ट लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. शासकीय अथवा खासगी वाहनाने कार्यालयीन कामकाज करतानाही या नियमांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. पोलीस दल स्वतः नियमांचे पालन करून नागरिकांसमोर आदर्श निर्माण करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांना अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली आहे.

यासोबतच नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करून शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नागरिकांना आवाहन

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचे पालन करून अपघात टाळण्यासाठी सहकार्य करावे. “सुरक्षितता हीच जबाबदारी” या भावनेतून सजग नागरिक बनावे, असेही त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande