म्हाडाच्या १६ व्या लोकशाही दिनात १३ अर्जांवर सुनावणी
मुंबई, 13 एप्रिल (हिं.स.) - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) आज वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनात सोळावा लोकशाही दिन आयोजित करण्यात आला. ''म्हाडा''चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा.प्

 
लोकशाही दिन

 
मुंबई, 13 एप्रिल (हिं.स.) - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) आज वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनात सोळावा लोकशाही दिन आयोजित करण्यात आला. 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात नागरिकांच्या एकूण १३ अर्जांवर सुनावणी घेण्यात आली.

आजच्या या लोकशाही दिनामध्ये अनेक प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात आला. अर्जदार श्रीमती अश्लेषा आंबेकर यांच्या आई श्रीमती सुनीला आंबेकर, गिरणी कामगार सोडतीत अपोलो मिल योजनेतील संकेत क्रमांक एकमध्ये यशस्वी अर्जदार ठरल्या. मात्र, कागदपत्रांच्या पडताळणी नंतर व अपोलो मिलतर्फे प्राप्त पत्राच्या आधारे श्रीमती सुनीला आंबेकर यांना अपात्र ठरविण्यात आले. सदर निर्णय प्रकरणी अर्जदार यांनी अपील केले असता, उपायुक्त, कामगार विभाग यांनी दि. २ फेब्रुवारी, २०२६ रोजी संबंधित अर्जदार यांना पात्र ठरविण्यात आले. दरम्यान, यशस्वी अर्जदार श्रीमती सुनीला आंबेकर यांचे दुर्दैवाने निधन झाले. पात्रता निश्चिती झाल्यामुळे सदर सदनिकेचा ताबा मुलगी या नात्याने वारस म्हणून मिळावा याकरिता लोकशाही दिनामध्ये अर्ज सदर केला. सदर अर्जावर सुनावणी करताना 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी संबंधित अर्जदार यांनी सादर केलेल्या वारसाहक्क प्रमाणपत्राच्या आधारे संबंधित अधिकारी यांनी श्रीमती अश्लेषा आंबेकर यांना त्वरित सदनिकेचा ताबा देण्याचे निर्देश दिले. श्रीमती अश्लेषा आंबेकर यांना सदनिकेचे ताबा पत्र बुधवार दिनांक १५ एप्रिल, २०२६ रोजी प्रदान करण्यात येणार आहे.

श्री. रामकृष्ण पाताडे हे कोकण मंडळाच्या सन २०२४ मधील सदनिका सोडतीत विरार-बोळींज गृहनिर्माण योजनेत यशस्वी अर्जदार ठरले. मात्र, बँकेकडून कर्ज मंजुरीस विलंब झाल्याने सदनिकेची विक्री किंमत भरण्यास उशीर झाला आणि त्यामुळे मंडळातर्फे नियमानुसार त्यांच्यावर रु. १,८३,०००/- इतकी व्याज आकारणी करण्यात आली. सदर व्याज माफ करण्याबाबत श्री. पाताडे यांनी आजच्या लोकशाही देण्यात अर्ज केला. सदर अर्जावर सुनावणी करताना श्री. संजीव जयस्वाल यांनी विशेष बाब म्हणून व मानवतेच्या दृष्टिकोनातून श्री. पाताडे यांचे व्याज माफ करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच, विरार-बोळींज गृहनिर्माण योजनेतील अशाच प्रकारच्या इतर प्रकरणांमध्येही समान न्याय व सुसंगतता राखण्यासाठी अशाच प्रकारची कार्यवाही करण्याचे निर्देशही श्री. जयस्वाल यांनी यावेळी दिले.

आजच्या लोकशाही दिनात तसेच श्रीमती सुरेखा पेठे यांनी गिरगाव येथील पारिजात सदन इमारतीतील रूम नंबर ३५ नियमितीकरणाची दंडात्मक रक्कम आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे माफ करण्याबाबत अर्ज केला. यावेळी श्री. संजीव जयस्वाल यांनी रु. १४,७५० मुद्दल अर्जदाराने भरणे गरजेचे असून त्यावर आकारलेले रु. ६५००० व्याज संपूर्णतः माफ करण्याचा निर्णय घेतला.

अर्जदार श्री. अनिल नाईक यांनी सहकार नगर, चेंबूर येथील इमारत क्रमांक ३८ च्या पुनर्विकासासाठी म्हाडाने दिलेले ना हरकत प्रमाणपत्र सुधारित करण्याची तसेच इमारतीला १०० टक्के भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत अर्ज केला. सदर अर्जावर सुनावणी करताना 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनीसंबंधित कार्यकारी अभियंता यांनी सदर इमारतीची पाहणी करावी व सदर प्रकरणाबाबत पाच सदस्यीय समिती गठित करावी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

श्री. संजय बाबरे यांनी माहीम येथील दालमिया कंपाऊंड इमारतीत रुम नं. १५ च्या पात्रता यादीत नाव टाकण्याबाबत अर्ज केला. सदर अर्जावर सुनावणी करताना श्री जयस्वाल यांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना इमारतीला भेट देऊन पाहणी करावी व पोलिसांनी केलेल्या पंचनाम्याचे तपशील तपासून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

श्रीमती कल्याणी साळवी या उपकरप्राप्त इमारत ३६७ बी, लालू बाई चाळ मधील खोली क्रमांक ३२ मधील भाडेकरू/रहिवासी असून आजच्या लोकशाही दिनात बृहतसूचीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट करून मालकी हक्कावर निवासी सदनिका वितरण करण्याबाबत अर्ज केला. सदर अर्जावर सुनावणी करताना श्री. संजीव जयस्वाल यांनी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी यांनी तात्काळ सुनावणी घेऊन १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande