
धुळे , 13 एप्रिल (हिं.स.) वालखेडा (ता. शिंदखेडा) येथील एकाचा खून केल्याबद्दल दोन चुलत भावांना जन्मठेप ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. तापकिरे यांनी हा निकाल दिला. वालखेडा येथील साहेबराव भीमराव मोरे (वय ४२) यांच्या खूनप्रकरणी चुलत भाऊ मंगेश उत्तम मोरे, चेतन बारकू मोरे यांना दोषी ठरविण्यात आले. मृताचे गावातील एकाच्या पत्नीशी अनैतिक संबंधाचा संशय दोघा आरोपींना होता. तसेच दोन लाखांची थकबाकी मागणी सुरू होती. या कारणावरून दोघांनी संगनमताने कट रचला. ४ मार्च २०२२ ला रात्री सुमारे दहाच्या सुमारास साहेबराव मोरे यांना हरभरे खाण्याच्या बहाण्याने शेतात नेले. वाघाडी फाट्याजवळील हॉटेलमध्ये मद्यपान केल्यानंतर त्यांना परिसरातील अकिल पिंजारी यांच्या मक्याच्या शेतात नेले. तेथे हाताबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून त्यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह प्लास्टिक पाल व गोधडीत गुंडाळला, पुरावा नष्ट करण्यासाठी मृताचे कपडे जामफळ धरणाजवळ जाळण्यात आले. या प्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. गणेश वाय. पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद करून एकूण दहा साक्षीदारांची साक्ष नोंदविली. यात पंच साक्षीदार, फिर्यादी, मृताची आई, संशयितांनी कबुली दिल्याचा साक्षीदार हितेश विश्राम गिरनार, शवविच्छेदन करणारे डॉ. व्ही. एन. पाटील, तपासी अधिकारी मनोज ठाकरे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. रासायनिक विश्लेषण अहवाल व इतर पुरावेही सादर करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर