
नाशिक, 13 एप्रिल (हिं.स.)आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरालगत असलेल्या ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेल्या गावांतील प्राचीन मंदिरांचा तसेच धार्मिक स्थळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
नाशिक येथील श्री क्षेत्र सिद्धेश्वर देवस्थान, लाखलगाव येथे आयोजित गोशाळा व वसतिगृह भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास जगद्गुरु महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज, ह.भ.प. रामकृष्ण महाराज लहवितकर, महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर मच्छिंद्र सानप, माजी आमदार बाळासाहेब सानप, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, देवस्थानचे अनिल कांडेकर, निलेश सुर्वे, निवृत्ती कांडेकर, ज्ञानेश्वर गामणे, विजय साने, बापू पिंगळे, चंद्रकांत खोडे, निलेश बोरा, नाशिक जिल्ह्यातील कीर्तनकार तसेच देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंत्री महाजन म्हणाले की , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील प्रमुख धार्मिक स्थळांचा विकास करण्यात आला असून, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पर्यटन मंत्री म्हणून कार्य करताना तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी निधी वाढवण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी जगद्गुरु शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते गोशाळा व वसतिगृहाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी लाखलगाव परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV