
रायगड, 13 एप्रिल (हिं.स.) : दुर्गराज रायगड किल्ला येथे होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा-2026 च्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. यावर्षी हा सोहळा तारखेनुसार 6 जून तर तिथीनुसार 26 जून 2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार असून लाखो शिवप्रेमी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित नियोजन बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस युवराजनी संयोगिता राजे भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तसेच अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती व दुर्गराज रायगड समितीचे सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले की, राज्यभरातून येणाऱ्या शिवभक्तांच्या सोयीसाठी पार्किंग व्यवस्था, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, स्वच्छता, प्रसाधनगृहे आणि परिवहन यांचे योग्य नियोजन अत्यावश्यक आहे. कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.
तसेच पार्किंग स्थळांपासून गडाकडे जाणाऱ्या मार्गांवर प्रकाशयोजना करणे, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी साउंड सिस्टीमची व्यवस्था करणे आणि नागरिकांना मार्गदर्शन करणारे माहिती फलक लावणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवराज्याभिषेक सोहळा सुरळीत व भव्यदिव्य पार पडण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी वेळेत पूर्ण करावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)