
पुणे, 13 एप्रिल (हिं.स.)सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्य शासनाने शिधापत्रिकेवरून रॉकेल देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिलिटर ६२ रुपये या दराने हे रॉकेल उपलब्ध करून दिले जाणार आहे. शासनाकडून कमी पुरवठा झाल्याने नगरपालिका क्षेत्र वगळण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे केवळ ग्रामीण भागातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनाच या रॉकेलचा पुरवठा केला जाणार आहे.
राज्य शासनाकडून पुणे जिल्ह्याला दोन लाख चार हजार लिटर रॉकेलचा पुरवठा केला आहे. मागणीपेक्षा कमी पुरवठा झाल्याने जिल्हा प्रशासनाने तालुकानिहाय वाटपाचा कोटा निश्चित केला आहे. यात बारामती तालुक्याला सर्वाधिक ३३ हजार लिटर रॉकेल पुरवठा केला जाणार असून इंदापूर तालुक्यात २७ हजार लिटरचा पुरवठा होणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु