
लातूर, 13 एप्रिल (हिं.स.)।
: लातूर पाटबंधारे विभागामार्फत १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६' चे आयोजन करण्यात आले आहे. जलसंपत्तीचे योग्य नियोजन करणे आणि लाभधारकांमध्ये या कार्यक्रमांची माहिती देऊन जागृती निर्माण करणे हा या पंधरवड्याचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेची सुरुवात १५ एप्रिल रोजी होणार आहे.
या पंधरवडा कालावधीत विविध उपक्रम राबविले जाणार असून, १६ एप्रिल रोजी जलसंपदा अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल, तर १७ एप्रिल रोजी 'स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय' आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगविषयक उपक्रम राबविला जाणार आहे. १८ एप्रिल रोजी शेतकरी व पाणी वापर संस्थांशी संवाद साधला जाईल आणि १९ एप्रिल रोजी 'जागतिक महिला शेतकरी वर्ष' निमित्त विशेष कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. पुढील टप्प्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान भूसंपादन व पुनर्वसनाच्या अडचणी सोडविणे, कालवा संयुक्त पाहणी, धरण व कालवा स्वच्छता अभियान, नदी प्रदूषण नियंत्रण आणि उपसा सिंचन परवान्याबाबतच्या तक्रारींचे निवारण केले जाईल.
२३ एप्रिल रोजी जलसंपदा व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पीक पद्धती बदल, उत्पादकता वाढ आणि पाण्याचे नियोजन यावर कार्यशाळा व प्रदर्शने आयोजित केली जातील. २४ एप्रिलला सिंचन ई-प्रणाली आणि पाणीपट्टी वसुलीबाबत तक्रार निवारण होईल, तर २५ एप्रिलला विद्यापीठ, केव्हीके व सेवाभावी संस्थांशी संवाद साधला जाईल. पंधरवड्याच्या शेवटच्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचे जललेखा परीक्षण, आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन आणि महसूल विभागाच्या समन्वयाने सातबारा उतारा दुरुस्ती व अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही केली जाणार आहे. २९ एप्रिल रोजी पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
या विशेष मोहिमेचा समारोप ३० एप्रिल २०२६ रोजी लातूर येथे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून, पंधरवडा कालावधीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या अभियंत्यांचा विशेष सत्कार देखील करण्यात येणार आहे. तरी लाभक्षेत्रातील सर्व सिंचन लाभधारकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता रो. सु. जगताप यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis