
नाशिक, १३ एप्रिल (हिं.स.) : नाशिकमधील गाजत असलेल्या म्हाडा फसवणूक प्रकरणात १९४ विकासकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर राज्य शासनाने आता या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठित करण्यात आली असून, या समितीला महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या प्रकरणामुळे नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा समावेश असल्याची चर्चा आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे हा मुद्दा उपस्थित करत सर्वसामान्यांच्या हक्काची घरे कशाप्रकारे लाटली गेली, तसेच म्हाडा आणि महसूल विभागाची झालेली फसवणूक सभागृहासमोर मांडली होती.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी SIT स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शासन आदेश जारी करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान ज्या प्रकल्पांमध्ये २० टक्के राखीव क्षेत्र उपलब्ध करून दिले नाही, त्या ठिकाणी संबंधित जमीनमालक व विकासकांवर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
समितीला नियमांनुसार राखीव घरे व जागा वसूल करणे, दोषी अधिकारी-कर्मचार्यांची जबाबदारी निश्चित करणे, तसेच त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुचवणे आणि भविष्यात अशा प्रकारच्या फसवणुकीस प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना सुचवण्याचे काम सोपवण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण..?
महापालिका क्षेत्रातील चार हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये २० टक्के घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) व अल्प उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी राखीव ठेवणे बंधनकारक असते. ही घरे म्हाडाकडे वर्ग करणे आवश्यक असते. मात्र, नाशिकमधील अनेक विकासकांनी प्रकल्पाचे क्षेत्र कागदोपत्री कमी दाखवून किंवा इतर मार्गांनी ही अट टाळल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील काही संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केले असून, काही जण अटकेच्या भीतीने फरार झाल्याची माहिती आहे.
सहा सदस्यीय समितीया एसआयटीच्या अध्यक्षपदी नाशिक विभागीय आयुक्त असून, जमाबंदी आयुक्त पुणे, नोंदणी महानिरीक्षक, पोलीस आयुक्त नाशिक, नगररचना विभागाचे संचालक पुणे यांचा समितीत समावेश आहे. उपसंचालक भूमी अभिलेख, नाशिक हे सदस्य सचिव म्हणून कार्य पाहणार आहेत.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार देवयानी फरांदे यांनी म्हटले की, “ही फसवणूक अत्यंत गंभीर असून सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांवर डल्ला मारण्यात आला आहे. दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी कडक यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे.”------------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV