
नांदेड, 13 एप्रिल (हिं.स.)। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त “डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम” अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
याच अनुषंगाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. विठ्ठल प्रभाकरराव मोरे हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सचिन सूर्यवंशी हे होते. कार्यक्रमास संस्थेतील कर्मचारी, प्रशिक्षणार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार, युगपुरुष, विद्वान कायदेतज्ञ, अर्थतज्ञ, समाजसुधारक आणि दूरदृष्टीचे नेते होते. त्यांच्या विचारांनी समाजाला समता, न्याय आणि बंधुतेचा मार्ग दाखविला आहे.कार्यक्रमाची सुरुवात विजतंत्री व्यवसायाचे शिल्पनिदेशक खडसे एस. जी. यांच्या गीताने झाली. प्रमुख व्याख्याते डॉ. मोरे यांनी अत्यंत प्रभावी व उद्बोधक मार्गदर्शन करताना डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीत डॉ. आंबेडकर यांचे योगदान अधोरेखित करत लोकशाही, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, समता व बंधुता या मूल्यांवर आधारित आधुनिक भारताचा पाया त्यांनी रचल्याचे सांगितले.
तसेच महिलांना शिक्षणाच्या संधी, सतीप्रथा निर्मूलन, मतदानाचा हक्क, कामगार कायदे, महिलांचे हक्क, आर्थिक समता आणि समान वेतन यासाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाली असून देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, यामागे डॉ. आंबेडकर यांचे अमूल्य योगदान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis