
परभणी, 13 एप्रिल (हिं.स.)।
परभणी येथील आर.पी. हॉस्पिटलमध्ये ८० वर्षीय वृद्ध महिलेवर पायातील रक्तवाहिन्यांतील ब्लॉकेज काढण्यासाठी अत्याधुनिक ‘कटिंग बलून’ तंत्रज्ञानाद्वारे अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. विशेष म्हणजे, परभणी शहरात अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया ठरली असून, गरजू रुग्णांसाठी रुग्णालय ‘संजीवनी’ ठरत असल्याचे दिसून आले.
सदर वृद्ध महिला गेल्या काही दिवसांपासून पाय दुखणे व सुन्न होणे या त्रासाने त्रस्त होती. तपासणीत त्यांना जुनाट मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच पूर्वी हृदय शस्त्रक्रिया झाल्याचे आढळून आले. त्यामुळे शस्त्रक्रिया करणे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते.
आर.पी. हॉस्पिटलमधील तज्ज्ञांनी रुग्णाची अँजिओग्राफी केली असता गुडघ्यापासून तळपायापर्यंत रक्तवाहिन्यांमध्ये तीन ठिकाणी मोठे ब्लॉकेज असल्याचे स्पष्ट झाले. रक्तपुरवठा थांबल्याने पाय निकामी होण्याचा धोका निर्माण झाला होता.
रुग्णाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, मोठ्या शहरात उपचार घेणे शक्य नसल्याने हॉस्पिटलच्या टीमने पुढाकार घेत परभणीतच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. रक्तवाहिनी व आंतररक्तवाहिनी शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. मनोज हंबर्डे यांनी त्यांच्या टीमसह ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.
या प्रक्रियेत बारीक रक्तवाहिन्यांसाठी विशेष बलून तसेच कडक ब्लॉकेज काढण्यासाठी ‘कटिंग बलून’ तंत्राचा वापर करण्यात आला. यामुळे रुग्णाच्या पायातील रक्तपुरवठा सुरळीत झाला. या शस्त्रक्रियेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, खासगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च येणारी ही प्रक्रिया शासकीय योजनेअंतर्गत पूर्णतः मोफत करण्यात आली. त्यामुळे रुग्णाच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी सांगितले की, संस्थापक आ. डॉ. राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात अशा सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया करण्यासाठी आर.पी. हॉस्पिटल सक्षम राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis