
लातूर, 13 एप्रिल (हिं.स.) : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याची आवक वाढू लागल्याचे चित्र दिसत आहे. मागील काही दिवसांपूर्वी आवक कमी-जास्त प्रमाणात होत होती, मात्र आता आवकेत वाढ झाल्याने बाजारात हालचाल वाढली आहे.गत आठवड्याच्या तुलनेत शनिवारी बाजार समितीत भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. ग्रामीण भागासह शेजारील जिल्हे तसेच शेजारी राज्यातूनही भाजीपाल्याचा पुरवठा सुरू असल्याचे दिसून येत आहे.
सध्या बाजारात येणारा भाजीपाला दर्जेदार असला तरी अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने त्यांच्यात चिंता व्यक्त केली जात आहे. काही आडत व्यापाऱ्यांच्या मते, उच्च प्रतीचा भाजीपाला बाजारात येत असल्याने काही प्रमाणात दरात वाढ झाली आहे.
मागील काही दिवसांत काही भाज्यांची आवक वाढल्याने त्यांच्या दरात घसरण होऊन ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने पुन्हा किरकोळ बाजारात दर वाढले आहेत.
शहरातील किरकोळ बाजारात मिरची, गवार, कारले, दोडका, मेथी यांसारख्या भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. तसेच भेंडी, टोमॅटो, काकडी, मेथी, पालक आणि फ्लॉवर यांसारख्या दैनंदिन भाज्या ३० ते ५० रुपये प्रति किलो दराने विकल्या जात आहेत.
काही भाज्यांना मात्र पुरवठा जास्त असल्याने अत्यंत कमी दर मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाजारातील अस्थिर दरांचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत असून त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis