नाशिकमध्ये तीन नवीन वेलनेस सेंटर उभारण्याचा प्रस्ताव; केंद्रीय योजनेला गती
नाशिक, १३ एप्रिल (हिं.स.) : केंद्रीय शासकीय कर्मचारी आणि निवृत्त नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिकमध्ये तीन नवीन वेलनेस सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्या
नाशिकमध्ये तीन नवीन वेलनेस सेंटर उभारण्याचा प्रस्ताव; केंद्रीय योजनेला गती


नाशिक, १३ एप्रिल (हिं.स.) : केंद्रीय शासकीय कर्मचारी आणि निवृत्त नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिकमध्ये तीन नवीन वेलनेस सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार असून यासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.

सध्या नाशिकमध्ये केवळ एकच वेलनेस सेंटर कार्यरत असून सुमारे २० हजार लाभार्थ्यांचा भार त्यावर आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असल्याने त्यांना उपचारांसाठी १२ ते २० किमी अंतर प्रवास करावा लागत आहे. वाढती गर्दी, प्रतीक्षेचा कालावधी आणि अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची परिस्थिती आहे.

या पार्श्वभूमीवर लेखानगर-इंदिरानगर, देवळाली-नाशिकरोड आणि पंचवटी या भागांत तीन नवीन वेलनेस सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या केंद्रांमुळे आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि जवळच्या परिसरात उपलब्ध होणार असल्याचे मानले जात आहे.

तसेच आगामी नाशिक - त्र्यंबकेश्वर कुंभमेळा लक्षात घेता शहरातील आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिरिक्त वेलनेस सेंटर उभारणे अत्यावश्यक असल्याचेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.या निर्णयामुळे नाशिकमधील केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande