
टँकर व अधिग्रहणासाठी मोठी तरतूद
लातूर, 13 एप्रिल (हिं.स.) : जिल्ह्यात वाढत्या उन्हाळ्यामुळे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १ एप्रिल ते ३० जून या कालावधीसाठी ९ कोटी ९८ लाख १३ हजार रुपयांचा संभाव्य टंचाई निवारण कृती आराखडा तयार केला आहे.
या आराखड्यात टँकर व बैलगाडीद्वारे पाणीपुरवठ्यासाठी २ कोटी ६७ लाख ७० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच खाजगी विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहित करण्यासाठी ४ कोटी ४३ लाख ४३ हजार रुपये, नवीन विंधन विहिरींसाठी २ कोटी ५० लाख रुपये आणि नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी ३७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
उन्हाची तीव्रता वाढत असल्याने ग्रामीण भागातील नद्या, नाले आणि ओढे कोरडे पडू लागले आहेत. यामुळे नागरिकांसह पशुधनासाठीही पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
जळकोट, अहमदपूर, औसा, शिरूर अनंतपाळ आणि उदगीर तालुक्यांतील २१ ग्रामपंचायतींनी पाणी अधिग्रहणाची मागणी पंचायत समिती स्तरावर केली आहे. विशेषतः अहमदपूर तालुक्यातील सलगरा, व्होटाळा, थावरतांडा, खरकाडी तांडा, नांदूरा खुर्द, विजयनगर तांडा, घसवाडी, विळेगाव, काळेगाव, कुमठा बुद्रुक आणि जवळगा या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे.
औसा, उदगीर आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यांतूनही अनेक गावांनी अधिग्रहण प्रस्ताव दाखल केले आहेत. जिल्ह्यातील एकूण १७ गावे आणि ४ वाड्या-तांड्यांमध्ये पाणीटंचाई तीव्र झाल्याचे ग्रामपंचायतींच्या अहवालातून समोर आले आहे.
प्रशासनाकडून या प्रस्तावांची पाहणी करून पुढील कार्यवाही सुरू आहे. उन्हाळा वाढत जाईल तसे पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून टंचाई निवारण उपाययोजना वेगाने राबवण्यावर भर देण्यात येत आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis