
बीड, 13 एप्रिल (हिं.स.)। भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने सचिन सुधाकर सटाले (रा. तडोळी, ता. परळी) नामक २९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शहरातील परळी-गंगाखेड मार्गावरील एकमिनार चौक ते उड्डाणपूल यादरम्यान हा अपघात घडला. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजीनगर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.
हा ट्रक परळी-गंगाखेड रस्त्याने जात होता. दरम्यान, त्याने ट्रक हयगईने, निष्काळजीपणे भरधाव चालवून सचिन सटाले यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर मयत सचिन याचे
चुलते माणिक रामकृष्ण सटाले यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१ व १०६ (१) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल शिंदे पुढील तपास करीत आहेत. हा अपघात नेमका कसा झाला, याचा शोध पोलिस घेत आहेत.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis