रत्नागिरी : जमिनीच्या वादातून सख्ख्या भावांमध्ये हाणामारी; तिघे जखमी
रत्नागिरी, 13 एप्रिल, (हिं. स.) : तालुक्यातील काळबादेवी-नवानगर (ता. रत्नागिरी) येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या भावांमध्ये झालेल्या वादाचे तीव्र रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत तिन्ही भाऊ जखमी झाले असून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी त
रत्नागिरी : जमिनीच्या वादातून सख्ख्या भावांमध्ये हाणामारी; तिघे जखमी


रत्नागिरी, 13 एप्रिल, (हिं. स.) : तालुक्यातील काळबादेवी-नवानगर (ता. रत्नागिरी) येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या भावांमध्ये झालेल्या वादाचे तीव्र रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत तिन्ही भाऊ जखमी झाले असून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारींवरून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष प्रभाकर मयेकर (वय ४९) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा मोठा भाऊ राकेश प्रभाकर मयेकर (वय ५१) हातात लाकडी दांडका घेऊन घराच्या अंगणात आला आणि बांधकामाच्या वादातून संतोष यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात संतोष यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. तसेच अंगणातील दुचाकीचे नुकसान करण्यात आले, सिमेंटचे खांब तोडण्यात आले आणि घरात घुसून जमिनीची कागदपत्रे चोरून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय आईला ढकलून देत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, राकेश मयेकर यांनीही आपल्या दोन्ही भावांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते सकाळी कामावर जात असताना जगदीश प्रभाकर मयेकर (वय ५५) आणि संतोष मयेकर यांनी त्यांना अडवून बांधकामाचा बांबू तोडण्यास सांगितले. यावरून वाद वाढत हाणामारी झाली. संतोष यांनी धक्काबुक्की केली, तर जगदीश यांनी लाकडी दांडक्याने पाठीवर आणि डाव्या हातावर वार करून त्यांना जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेमुळे नवानगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande