शरद मोहोळ खून प्रकरण : आरोपी वकिलाचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला
पुणे, 13 एप्रिल (हिं.स.)कोथरूडमधील गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी वकिलाचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला. ॲड. संजय उडाण असे जामीन अर्ज फेटाळून लावलेल्या वकिलाचे नाव आहे. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात शरद मोहोळ याच्यावर पिस्तुलातून गो
शरद मोहोळ खून प्रकरण : आरोपी वकिलाचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला


पुणे, 13 एप्रिल (हिं.स.)कोथरूडमधील गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी वकिलाचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला. ॲड. संजय उडाण असे जामीन अर्ज फेटाळून लावलेल्या वकिलाचे नाव आहे. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात शरद मोहोळ याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करुन खून करण्यात आल्याची घटना दोन वर्षंपूर्वी घडली होती. वैमनस्य, तसेच वर्चस्वाच्या वादातून मोहोळ याचा खून गणेश मारणे टोळीतील सराइतांनी केला होता.

या प्रकरणी पोलिसांनी मारणे याच्यासह साथीदारांना अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली होती. मोहोळ याचा खून झाल्यानंतर सूत्रधार नामदेव कानगुडे याच्याशी ॲड. उडाण यांनी संपर्क साधला होता. मोहोळ याच्यावर गोळीबार करणारे आरोपी ॲड. उडाण यांना भेटले.

त्या वेळी मोहोळवर गोळीबार करणारा आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, चंद्रकांत शेळके तेथे उपस्थित होते. ॲड. उडाण यांनी त्यांना मोटारीतून पसार होण्यास सांगितले. ॲड. उडाण यांनी या प्रकरणातील सहआरोपी वकील ॲड. रवी पवार यांच्याशी संपर्क साधून आराेपींना पसार होण्यास सांगितले होते. आरोपी मोटारीतून पसार झाल्यानंतर त्यांना मोबाइलमधील सीमकार्ड नष्ट करण्यास सांगितले होते. खेड शिवापूर टोलनाक्याजवळ आरोपींना नवीन सीमकार्ड देण्यात आले. नवी मुंबईतील एका पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क साधून आरोपींना करुन देतो, असे सांगितले होते, असे पोलीस तपासात उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी ॲड. उडाण, ॲड. पवार यांना अटक केली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande