
पुणे, 13 एप्रिल (हिं.स.)अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, बाल साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन अशी अनेक संमेलने आपण बघतो. पण या वर्षापासून ‘वारकरी साहित्य संमेलन’देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू केले जाईल,’ अशी घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली, तसेच ‘वारकरी संप्रदायाची परंपरा आबालवृद्ध जपत असल्यामुळे समाजात धर्मांध शक्तींना थारा मिळणार नाही,’ असेही सामंत यांनी म्हटले.
संत विचार प्रबोधिनी आणि डॉ. रामचंद्र देखणे साहित्य-कला प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भावार्थ देखणे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, पुरुषोत्तम पाटील, सचिन इटकर आदी उपस्थित होते.
यंदाचा कीर्तन सेवा पुरस्कार संत नामदेव महाराज यांचे वंशज केशव महाराज नामदास आणि लोककला सेवा पुरस्कार भारूडसम्राज्ञी चंदाताई तिवाडी यांना प्रदान करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु