रत्नागिरी : आंबडवे येथे डॉ. आंबेडकरांचे जागतिक दर्जाचे स्मारक : उदय सामंत
रत्नागिरी, 14 एप्रिल, (हिं. स.) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक पातळीवरचे उत्तुंग नेतृत्व होते. त्यांचे विचार सर्वदूर पोहोचवण्याकरिता शासन कितीही खर्च करण्यास मागेपुढे पाहणार नाही. बाबासाहेबांचे जागतिक दर्जाचं स्मारक आंबडवे या त्यांच्या
आंबडवे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम


रत्नागिरी, 14 एप्रिल, (हिं. स.) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक पातळीवरचे उत्तुंग नेतृत्व होते. त्यांचे विचार सर्वदूर पोहोचवण्याकरिता शासन कितीही खर्च करण्यास मागेपुढे पाहणार नाही. बाबासाहेबांचे जागतिक दर्जाचं स्मारक आंबडवे या त्यांच्या मूळ गावी केले जाणार असून, त्यासाठी आर्थिक अन्याय होणार नाही, याची जबाबदारी माझी, अशी ग्वाही रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योग तथा मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी दिली.

मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी त्यांच्या १३५व्या जयंतीचा शासकीय कार्यक्रम सामाजिक न्याय आणि विशेष साह्य विभागाने आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते सर्वप्रथम ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सामंत आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला आणि अस्थिकलश स्थानीही पुष्पहार अर्पण करण्यात आला.

हे स्मारक पाहण्यासाठी देश-परदेशातील अनुयायी, अभ्यासक या गावी भेट देतील. या स्मारकाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार युवा पिढीपर्यंत पोहोचतील. बाबासाहेबांचा विचार हा फक्त एका समाजाचा नाही, तो देशाच्या एकसंघतेचा आहे. 'युद्ध नको बुद्ध हवा' हा बुद्धांचा, बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन जायला हवा, असे प्रतिपादन सामंत यांनी केले.

आंबडवे हे गाव माझ्या मतदारसंघात आहे, हे मी माझे भाग्य समजतो. माझ्यासाठी हा ऊर्जेचा स्रोत आहे. पुनर्वसनातल्या तांत्रिक अडचणी सोडवून स्मारकाच्या कामाला गती दिली जाईल. भूसंपादनाच्या निकषात विशेष बाब म्हणून निधी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. बाबासाहेबांची जयंती समाजातील सर्व घटकांची आहे, या विचाराचा आदर्श मंडणगडमधून निर्माण करू, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी केले.

दरम्यान, स्मारकाला आज अनेक अनुयायांनी भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande