
लातूर, 14 एप्रिल (हिं.स.) : भारतीय जनता पार्टी लातूर (ग्रामीण) जिल्ह्याच्या वतीने विधानसभा निहाय नियुक्त ‘बूथ लेव्हल एजंट’ (BLA) साठी ‘मतदार यादी पुनरीक्षण अभियान’ (SIR) अंतर्गत कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना डॉ. कराड म्हणाले की, “लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार यादी निर्दोष असणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक पात्र मतदाराची नोंदणी करणे हेच या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.”
जिल्हाध्यक्षांनी यावेळी जिल्ह्यातील अभियानाचा सविस्तर आढावा सादर करताना सांगितले की, लातूर ग्रामीण जिल्ह्यातील प्रत्येक बूथवर हे अभियान प्रभावीपणे राबवून शंभर टक्के त्रुटीमुक्त मतदार यादी तयार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. विशेषतः १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांची नोंदणी, विवाहित महिलांच्या नावनोंदणीसाठी २००२ च्या यादीचा तांत्रिक आधार आणि डिजिटल माध्यमांचा वापर यावर भर देण्यात येत आहे.
या कार्यशाळेला औसा येथील आमदार अभिमन्यू पवार, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, जिल्हा परिषद सभापती शिवकन्या गोडभरले, प्रदेश उपाध्यक्ष अर्चना चाकूरकर, भाजप जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, जिल्हा परिषद गटनेते रामचंद्र तिरुके, अहमदपूर नगराध्यक्ष स्वप्नील व्हते, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष उत्तरा कलबुर्गे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश कराड, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहिदास वाघमारे यांच्यासह BLA म्हणून नियुक्त प्रा. भीमाशंकर राचट्टे, सिद्धेश्वर पवार आणि कुमोद लोभे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामचंद्र तिरुके यांनी केले, सूत्रसंचालन चंद्रप्रकाश हांगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सिद्धेश्वर पवार यांनी मानले. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व BLA आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis