
डोंबिवली, 14 एप्रिल (हिं.स.)शहरातील राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, अरुणोदय प्राथमिक शाळेने आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवत राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल कामगिरीमुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता तिसरीतील कुमार कौस्तुभ सत्यवान गावकर याने राज्यात ७४ वा क्रमांक मिळवत उत्कृष्ट यश संपादन केले. तसेच इयत्ता सहावीतील कुमार अजिंक्य अविन मंडलिक यानेही १५८ वा क्रमांक मिळवत आपल्या गुणवत्तेची छाप पाडली.
याचबरोबर विज्ञान क्षेत्रातही शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. प्रतिष्ठेच्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत इयत्ता सहावीतील भूषण समीर सक्रे याने आपल्या वैज्ञानिक प्रतिभेचा उत्कृष्ट नमुना सादर करत सिल्वर मेडल आणि सन्मानपत्र पटकावले. विज्ञानाविषयीची जिज्ञासा, संशोधनाची आवड आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेले हे यश विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
या सर्व यशामागे शाळेतील समर्पित शिक्षकवर्गाचे मार्गदर्शन आणि मुख्याध्यापक सुरेश नारोळे यांचे प्रेरणादायी नेतृत्व महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी आत्मविश्वास आणि जिद्द निर्माण झाली आहे.
या तिन्ही विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशामुळे अरुणोदय प्राथमिक शाळेचे नाव महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात उजळले असून संस्था, शिक्षकवर्ग आणि पालकांनी त्यांचे कौतुक करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi