
बीड, 14 एप्रिल (हिं.स.)।आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथे एका १८ वर्षीय तरुणाचा शेततलावात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. रितेश दीपक वाघमारे असे या मृत तरुणाचे नाव असून मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला असताना पाय घसरून हा भीषण अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रितेश आपल्या मित्रांसह गावातीलच एका शेततलावावर गेला होता. इतर मित्र निघून गेल्यानंतर तो आणि त्याचा एक साथीदार तिथे थांबले होते. काठावर कपडे धुवत असताना अचानक रितेशचा पाय घसरला आणि पोहता येत नसल्याने तो खोल पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह बाहेर काढला. कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रितेशच्या अकाली निधनाने वाघमारे कुटुंबाचा मोठा आधार हिरावला असून त्याच्या पश्चात आई, वडील, आजोबा आणि भाऊ असा परिवार पोरका झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis