

डोंबिवली, 14 एप्रिल, (हिं.स.)। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्ताने डोंबिवली शहरात आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरा केला. पूर्वेकडील इंदिरचौकातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सकाळी कल्याण ग्रामीणचे आमदार तथा शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी आंबेडकरी अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा गगनभेदी घोषणांनी इंदिर चौक दणाणून गेला. यावेळी माणिक उघडे, लक्ष्मण मिसाळ, सतीश मोडक, दिनेश शिवलकर, सागर बापट, राजेंद्र नांदोस्कर, किशोर मगरे यांच्यासह मोठ्या संख्येने डोंबिवलीकर उपस्थित होते.
यावेळी आमदार राजेश मोरे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभर साजरी होतच असते. तसाच साऱ्या जगातही जयंती उत्सव साजरा होतो. बाबासाहेबांनी दिलेल्या आचार-विचारांचे आपण सर्वजण पालन करत आहोत. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर सर्वांनी चाललं पाहिजे. सर्वांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा.
शिवसेना मध्यवर्ती शाखा डोंबिवली पूर्व येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आमदार रेष मोरे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्याचप्रमाणे दत्तनगर येथे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी दत्तनगर डोंबिवली पूर्व तर्फे जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बुद्धवंदना करण्यात आली. विशेष म्हणजे जयंती उत्सव निमित्ताने भव्य चित्रप्रदर्शनी भरविण्यात आली होती. या प्रदर्शनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे चित्रप्रदर्शन लक्षवेधी होते. आमदार राजेश मोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. स्थानिक नगरसेवक हर्षल राजेश मोरे, माजी नगरसेवक राजन मराठे, नितीन पाटील, नगरसेविका ज्योती मराठे, नगरसेवक सूरज राजन मराठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रिपाई पदाधिकारी तथा समाजसेवक माणिक उघडे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नागरिकांनी देखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास पुष्पसुमने वाहून अभिवादन केले.
त्याचप्रमाणे तथागत प्रतिष्ठान ठाकुर्लीच्या वतीने परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती उत्सवाचे आयोजन बारा बंगला, पंचायत बावडी रोड, ठाकुर्ली पूर्व येथील स्मारका समोर करण्यात आले. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका - कविता पुणेकर यांच्या बुद्ध व भीम गीतांवर आधारित प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पाडला. स्थानिक कलावंतां तर्फे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले. यानंतर आरोग्य शिबिर आयोजित केले होते. तसेच संध्याकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दगडू पगारे यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi