
अमरावती, 14 एप्रिल (हिं.स.)। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त अमरावती शहरात उत्साह, जल्लोष आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले. मध्यरात्रीपासूनच शहरातील इर्विन चौक येथे अनुयायांची मोठी गर्दी उसळली होती. ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता, तर आतषबाजीने वातावरण अधिकच भारावून गेले.रात्री बारा वाजताच भीमसैनिकांनी मोठ्या उत्साहात महामानवांना अभिवादन केले. डीजेच्या तालावर युवकांनी जल्लोष साजरा करत जयंतीचा आनंद व्यक्त केला. संपूर्ण परिसर निळ्या रंगात न्हाऊन निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक अनुयायांनी निळे गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.आज पहाटेपासूनच दर्शनासाठी अनुयायांची मोठी रांग लागली होती. शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांतून हजारो नागरिक इर्विन चौकात दाखल झाले. महिलांपासून तरुणांपर्यंत आणि ज्येष्ठांपर्यंत सर्वच स्तरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अनुयायांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह आणि श्रद्धा हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.यावेळी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांनीही महामानवांना अभिवादन केले. पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत जनजागृती करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासनाच्या वतीनेही आदरांजली अर्पण करण्यात आली.सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. डीसीपी गणेश शिंदे, एसीपी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. एसआरपीएफची टुकडी तसेच कोतवाली पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी सतत सतर्क होते. गर्दी नियंत्रणासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली होती. याशिवाय वाहतुकीतही आवश्यक ते बदल करण्यात आले होते.दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती आणि सौंदर्यीकरण समितीच्या वतीने सामूहिक अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘जीवन गौरव’, ‘जीवन संघर्ष’ आणि ‘कर्तव्यपूर्ती’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.सांसद बलवंत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये सांसद अनिल बोंडे, आमदार सुलभा खोडके, संजय खोडके, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, डॉ. सुनील देशमुख, यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी आशीष येरेकर, माजी महापौर विलास इंगोले यांच्यासह अनेक सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.एकूणच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अमरावतीत उत्साह, एकता आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. भीमसागराच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाने महामानवांप्रती असलेली जनतेची निष्ठा आणि आदर पुन्हा एकदा अधोरेखित झाला.--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी