नंदुरबारमध्ये बिबट्याची दहशत; गोठयात शिरून सहा शेळ्यांचा पडला फडशा
नंदुरबार, 14 एप्रिल (हिं.स.) | तळोदा तालुक्यातील रेवानगर येथे बिबट्याने गोठ्यात घुसून सहा शेळ्या ठार केल्याची घटना दोन दिवसापूर्वी पहाटेच्या सुमारास घडली. घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, परिसरात भीती निर्माण झाली आहे. तळोदा तालुक्यात रेवानगर गावातील
नंदुरबारमध्ये बिबट्याची दहशत; गोठयात शिरून सहा शेळ्यांचा पडला फडशा


नंदुरबार, 14 एप्रिल (हिं.स.) | तळोदा तालुक्यातील रेवानगर येथे बिबट्याने गोठ्यात घुसून सहा शेळ्या ठार केल्याची घटना दोन दिवसापूर्वी पहाटेच्या सुमारास घडली. घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, परिसरात भीती निर्माण झाली आहे. तळोदा तालुक्यात रेवानगर गावातील वसंत बुध्या पावरा यांच्या पशुधनपालक वसंत पावरा यांनी घराशेजारच्या गोठ्यात त्यांच्या मालकीच्या सहा शेळ्या बांधल्या होत्या. शनिवारी रात्री व रविवार पहाटेच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात शिरून बांधलेल्या सहा शेळ्यांवर हल्ला चढवून शेळ्यांचे मानेचे, पोटाचे लचके तोडले.

यादरम्यान इतर शेळ्यांनी केलेल्या आवाजामुळे वसंत पावरा यांचे लक्ष वेधले गेले. त्यांना बिबट्या दिसून आल्यावर आरडाओरड केली. परंतू तोवर बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या सर्व शेळ्यांचा फडशा पडला होता. बिबट्याचा हल्ल्यात शेळ्या मृत झाल्याने शेतकऱ्याचे सुमारे पन्नास ते साठ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. बिबटच्या हल्ल्याची माहिती मि ळताच वनक्षेत्रपाल एस. बी. सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनरक्षक अमर वसावे, वीरसिंग पावरा, राहुल कोकणी, महेंद्र तडवी, आशितोष पावरा, जेकमसिंग वसावे, संदीप भंडारी, गिरधन पावरा आदींनी घटनास्थळी पाहणी केली. वनपाल गिरधन पावरा (राजविहीर) यांनी पंचनामा केला.यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महाकाल, डॉ. टोटोलकर तसेच मगन वळवी यांच्या उपस्थितीत मृत शेळ्यांचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी पोलिस पाटील भरत पावरा यांच्यासह दाज्या पावरा, लालसिंग पावरा, तेरसिंग पावरा, जामसिंग पावरा व ग्रामस्थ उपस्थित होते. वनविभागाने ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करुन पशुधनाची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande