चंद्रपुर : पालकमंत्र्यांनी रुग्णालयात जावून केली विषबाधित शेतक-यांची विचारपूस
चंद्रपूर, 14 एप्रिल, (हिं.स.)। बांबेझरी व कुसुंबी येथील शेतक-यांच्या जमिनीच्या प्रश्नावर शासन आणि प्रशासन अत्यंत संवेदनशील असून यावर योग्य तोडगा काढण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासन सकारात्मक आहे, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपू
चंद्रपुर: बांबेझरी-कुसुंबी प्रकरणात तोडगा काढण्यासाठी शासन प्रशासन सकारात्मक :- पालकमंत्री डॉ. अशोक वुईके रुग्णालयात जावून विषबाधित शेतक-यांची आस्थेने विचारपूस


चंद्रपूर, 14 एप्रिल, (हिं.स.)। बांबेझरी व कुसुंबी येथील शेतक-यांच्या जमिनीच्या प्रश्नावर शासन आणि प्रशासन अत्यंत संवेदनशील असून यावर योग्य तोडगा काढण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासन सकारात्मक आहे, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली.

सोमवारी जमिनीच्या प्रश्नावर विष प्राशन करणा-या शेतक-यांची आज (दि. 14) पालकमंत्री डॉ. वुईके यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. शासन आणि प्रशासन कोणालाही वा-यावर सोडणार नाही. राज्य सरकार शेतक-यांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी आश्वस्त केले.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, (चंद्रपूर), रविंद्र माने (राजुरा) व इतर डॉक्टर्स उपस्थित होते.

बांबेझरी आणि कुसुंबी येथील जमिनीच्या प्रश्नाबाबत शेतक-यांना न्याय मिळवून देण्याची शासनाची भुमिका आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, घडलेली घटना दुर्देवी आहे. यावर नक्कीच तोडगा काढला जाईल. पुढील आठ दिवसांत जिल्हाधिकारी स्वत: जिवती येथे येऊन या प्रश्नावर शेतक-यांशी सकारात्मक चर्चा करतील.

जीव हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये. येथे भरती विषबाधित रुग्णांच्या प्रकृतीकडे आम्हा सर्वांचे लक्ष आहे. चांगले उपचार करण्याच्या सुचना सर्व डॉक्टरांना दिल्या आहेत. तसेच सुट्टी झाल्यावर सर्व रुग्णांना रुग्णालयाच्या वाहनाने घरी पोहचवून देण्याचेही निर्देश दिले आहे, असे पालकमंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले. यावेळी त्यांनी रुग्णालयात भरती जंगू पेंदोर, मारुती तलांडे, जयराम कुडमेथे, बाळू सिडाम, लच्छु आत्राम या रुग्णांशी तसेच त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला व त्यांच्या समस्याही ऐकून घेतल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande