चंद्रपूर - पंकजा मुंडे यांचा गुरुवारी प्रदूषण पाहणी दौरा
चंद्रपूर, 14 एप्रिल (हिं.स.)। चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषण समस्यांबाबत सातत्याने आवाज उठवत पाठपुरावा करणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे या गुरु
चंद्रपूर - पंकजा मुंडे यांचा गुरुवारी प्रदूषण पाहणी दौरा


चंद्रपूर, 14 एप्रिल (हिं.स.)। चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषण समस्यांबाबत सातत्याने आवाज उठवत पाठपुरावा करणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे या गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र तसेच वेकोलीच्या कोळसा खाणींमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर आ. मुनगंटीवार यांनी दिनांक ११ मार्च २०२५ रोजी विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. या चर्चेत त्यांनी स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच पर्यावरणीय हानी यांचा ठोस पद्धतीने ऊहापोह केला होता. त्यानंतरही त्यांनी हा विषय सातत्याने लावून धरत २६ फेब्रुवारी २०२६ रोजी कोल वॉशरीजमधील अनियमितता व प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सीबीआय चौकशीची मागणी विधानसभेत केली. तसेच २४ मार्च २०२६ रोजी झरपट व इरई नद्यांच्या प्रदूषणाबाबत तसेच त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी चर्चेद्वारे मांडली.

या सर्व प्रभावी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभागृहात स्वतः चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता म्हणून हा महत्त्वपूर्ण दौरा होत असल्याचे बोलले जात आहे.

दौऱ्यादरम्यान पंकजा मुंडे या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, दुर्गापूर येथे प्रदूषणाची पाहणी करणार असून, बेलसणी येथील कोल वॉशरीज तसेच गडचांदूर येथील अल्ट्राटेक सिमेंट प्रकल्पालाही भेट देणार आहेत. भिवापूर परिसरातील नदी प्रदूषण स्थितीचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात येणार आहेत.

तसेच नियोजन भवन, चंद्रपूर येथे जिल्ह्यातील प्रदूषण प्रश्नांवर तसेच पशुपालकांच्या अडचणींवर शासकीय अधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande