अमरावतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
अमरावती, 14 एप्रिल, (हिं.स.)। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अमरावती शहरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार तसेच भाजपा नेत
अमरावतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; रवि राणा व नवनीत राणा यांच्याकडून अभिवादन व अन्नदान


अमरावती, 14 एप्रिल, (हिं.स.)। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अमरावती शहरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार तसेच भाजपा नेत्या व माजी खासदार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन चौक) येथे महामानवांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. “जयभीम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. यानंतर समाजसेवेचा उपक्रम राबवित रवि राणा व नवनीत राणा यांच्या हस्ते अनुयायी व नागरिकांना भाजी-पोळी तसेच बुंदीच्या लाडूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी नवनीत राणा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतापुरते मर्यादित नसून संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांनी दिलेली समता, बंधुता आणि स्वाभिमानाची शिकवण प्रत्येकाने आचरणात आणली पाहिजे. समाजातील दुर्बल घटकांसोबत उभे राहून सेवा करण्याचा संकल्प हाच त्यांना खरी आदरांजली आहे.”तर आमदार रवि राणा यांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान, समानतेचा अधिकार आणि शिक्षणाचे महत्त्व हे देशाच्या प्रगतीचे मूलभूत आधार आहेत. त्यांच्या विचारांवर चालत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय व सन्मान मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे.” त्यांनी जयंतीनिमित्त अन्नदान हा उपक्रम कृतज्ञतेचे प्रतीक असल्याचेही नमूद केले.यानंतर रवि राणा व नवनीत राणा यांनी शहरातील भिमटेकडी, उत्तम नगर, संजय गांधी नगर, दरोगा प्लॉट, बेलपुरा तसेच बडनेरा परिसरातील राहुल नगर, अशोक नगर, समता चौक आदी ठिकाणी भेट देत डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रमाला भाजपा शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, डॉ. राजेंद्र गवई, पोलीस आयुक्त राकेश ओला, शहर सुधार समिती सभापती राधा कुरील, माजी शहर अध्यक्ष किरण पातुरकर, उपमहापौर सचिन भेंडे यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करण्यात आला असून समाजात एकता, समता व सेवाभावाचा संदेश देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande