रावनकोळा शेतकऱ्यांचा ५० वर्षांचा प्रश्न सुटला; वहिवाटीचा रस्ता खुला
नांदेड, 14 एप्रिल (हिं.स.) : मुखेड तालुक्यातील रावनकोळा येथील शेतकऱ्यांना तब्बल ५० वर्षांनंतर मोठा दिलासा मिळाला असून वहिवाटीचा रस्ता अखेर खुला करण्यात आला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरा’ अंतर्गत सादर केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने
रावनकोळा शेतकऱ्यांचा ५० वर्षांचा प्रश्न सुटला; वहिवाटीचा रस्ता खुला


नांदेड, 14 एप्रिल (हिं.स.) : मुखेड तालुक्यातील रावनकोळा येथील शेतकऱ्यांना तब्बल ५० वर्षांनंतर मोठा दिलासा मिळाला असून वहिवाटीचा रस्ता अखेर खुला करण्यात आला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरा’ अंतर्गत सादर केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत हा मार्ग मोकळा करून दिला.

बा-हाळी मंडळांतर्गत येणाऱ्या रावनकोळा येथील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून शेतीसाठी जाण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्त्याअभावी त्यांना कर्नाटक राज्यातील चोंडी मार्गे सुमारे ७ किलोमीटरचा फेरा मारावा लागत होता. त्यामुळे वेळ, श्रम आणि खर्च यांचा मोठा बोजा शेतकऱ्यांवर पडत होता.

बा-हाळी येथे झालेल्या राजस्व समाधान शिबिरात रावनकोळा येथील सरपंच व शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी अनुप पाटील व तहसीलदार राजेश जाधव यांच्याकडे निवेदन देत समस्या सोडवण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने तातडीने निर्णय घेत मंडळ अधिकारी एस. आर. जांभळे व ग्राम महसूल अधिकारी ए. एच. वाडीकर यांना पंचनामा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

यानंतर भूमापक शेख अहमद यांनी सुमारे २ किलोमीटर लांबीचा व १२ फूट रुंदीचा रस्ता निश्चित करून १० एप्रिल रोजी प्रत्यक्ष मार्ग खुला करून दिला. या निर्णयामुळे सुमारे ५० शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande