
नागपूर, 14 एप्रिल (हिं.स.) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 134 व्या जयंतीनिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर नागपुरातील प्रसिद्ध दीक्षाभूमी येथे मंगळवारी सकाळपासून आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. यासोबतच राज्याचे महसूल मंत्रीचंद्रशेखर बावनकुळेंनी देखील दीक्षाभूमीवर जाऊन महामानवाला अभिवादन केले.
दीक्षाभूमीवर सकाळपासूनच शेकडो अनुयायी बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत अभिवादन करताना दिसले. यावेळी अनुयायांनी “जय भीम”चा जयघोष करत परिसर दुमदुमून टाकला. विविध सामाजिक संघटना तसेच समता सैनिक दलाच्या वतीनेही बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यासोबतच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी दीक्षाभूमीवरील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच बाबासाहेबांच्या समाजिक विचारांना उजाळात देत त्याचे अनुसरण करण्याचे आवाहन बावनकुळे यांनी केले. दीक्षाभूमी प्रमाणेच नागपूरच्या रिझर्व्ह बँक चौकातील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यालाही नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देत अभिवादन केले. सकाळच्या सत्रात दीक्षाभूमी परिसरात सामूहिक बुद्ध वंदना घेऊन डॉ. आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. संपूर्ण परिसरात शांतता, शिस्त आणि भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळाले असून, जयंतीनिमित्त विविध ठिकाणी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी