महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट; सरकारकडून तीन कृती आराखडे जारी
मुंबई, 14 एप्रिल (हिं.स.) : राज्यात सध्या तीव्र उष्णतेची लाट जाणवत असून विदर्भासह अनेक भागांत तापमानाने उच्चांक गाठला आहे. सर्वाधिक तापमान अकोला जिल्ह्यात 44 अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, अमरावतीत 43.8 अंश आणि सोलापूरमध्ये 43.2 अंश तापमानाची नों
हवामान लोगो


मुंबई, 14 एप्रिल (हिं.स.) : राज्यात सध्या तीव्र उष्णतेची लाट जाणवत असून विदर्भासह अनेक भागांत तापमानाने उच्चांक गाठला आहे. सर्वाधिक तापमान अकोला जिल्ह्यात 44 अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, अमरावतीत 43.8 अंश आणि सोलापूरमध्ये 43.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांमध्ये उकाडा आणि आरोग्याचा धोका वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने राज्य उष्णता कृती आराखडा आणि भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) रंग-कोडेड उष्णता सतर्कतांच्या अनुषंगाने तीन स्वतंत्र मानक कार्यपद्धती (एसओपीज) जारी केल्या आहेत. या एसओपीजचा उद्देश उष्णतेच्या लाटांमुळे होणारे आजार आणि मृत्यू कमी करणे तसेच असुरक्षित घटकांचे संरक्षण करणे हा आहे.

असुरक्षित घटकांसाठी विशेष संरक्षण योजना

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, या उपाययोजनांमुळे विशेषतः अनौपचारिक कामगार, खाण कामगार आणि कमी उत्पन्न गटांना मोठा दिलासा मिळेल. या एसओपीज मध्ये बाहेर काम करणारे मजूर, रस्त्यावरील विक्रेते, वाहतूक पोलीस, स्वच्छता कर्मचारी, डिलिव्हरी कामगार आणि रिक्षाचालक यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील उष्णता-जोखीम असलेल्या 15 जिल्ह्यांमध्ये विशेष उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. यात लातूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नांदेड यांचा समावेश आहे.

तीन स्वतंत्र एसओपीचे स्वरूप

पहिली एसओपी बाहेरील कामगारांसाठी असून कामाच्या वेळांमध्ये बदल, पाण्याचे ब्रेक, ओआरएस वितरण, सावली व्यवस्था आणि आरोग्य सुविधा मजबूत करणे यावर भर देण्यात आला आहे.

दुसरी एसओपी चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाण कामगारांसाठी असून थंड विश्रांती केंद्रे, वायुवीजन, जॉब रोटेशन आणि उष्णता आजार प्रशिक्षण यांचा समावेश आहे.

तिसरी एसओपी उष्णता-प्रतिरोधक गृहनिर्माणासाठी असून घरांचे थर्मल सुधारणा, कूल रूफ, हरित क्षेत्रे आणि हवामान-संवेदनशील शहरी नियोजन यावर भर देण्यात आला आहे.

सरकारचे आवाहन

राज्य सरकारने नागरिकांना दुपारी 11 ते 4 या वेळेत अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जनजागृती मोहिमा राबवण्याचे आणि एसओपीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा नियंत्रण कक्ष (1077), आपत्कालीन रुग्णवाहिका (108) आणि पोलीस हेल्पलाइन (112/100) यांचा वापर करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande