कंपनी सेक्रेटरी पदासाठी सर्वच क्षेत्रात चांगल्या संधी : पवन चांडक
कोल्हापूर, 14 एप्रिल (हिं.स.) : कंपनी सेक्रेटरी (सीएस) हा कंपनीच्या कामकाजातील अत्यंत महत्त्वाचा अधिकारी असून तो कायदेशीर व प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडतो, असे प्रतिपादन आयसीएसआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सीएस पवन चांडक यांनी केले. कोल्हापुरातील आयसीएसआ
आयसीएसआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सीएस पवन चांडक आणि स्वप्नील पाटोळे


कोल्हापूर, 14 एप्रिल (हिं.स.) : कंपनी सेक्रेटरी (सीएस) हा कंपनीच्या कामकाजातील अत्यंत महत्त्वाचा अधिकारी असून तो कायदेशीर व प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडतो, असे प्रतिपादन आयसीएसआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सीएस पवन चांडक यांनी केले.

कोल्हापुरातील आयसीएसआय कार्यालयाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

सीएस या व्यवसायाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अधिकाधिक आवड निर्माण व्हावी आणि हा अभ्यासक्रम उन्नत स्तरावर शिकवला जावा, यासाठी आयसीएसआय सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, कोल्हापूर चॅप्टरची स्थापना 2005 साली झाली असून येथे कार्पोरेट व प्रशिक्षणार्थी कंपनी सेक्रेटरी कार्यरत आहेत. हे सदस्य विविध नामांकित कंपन्यांशी जोडलेले असून कंपनी प्रशासन, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि व्यवसाय वृद्धीसाठी मार्गदर्शन करतात.

सीएस हा व्यावसायिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा आणि वेगळा पेशा असून त्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, सीएस परीक्षेची पातळी कठीण असली तरी अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवता येते, असेही त्यांनी नमूद केले.

सध्या देशात सुमारे दीड लाख कंपनी सेक्रेटरींची आवश्यकता असून आयसीएसआय त्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून देऊ शकत नाही, कारण या क्षेत्राबाबत पुरेसा प्रचार आणि प्रसार झालेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

बारावीनंतर कोणत्याही शाखेतील विद्यार्थी सीएस कोर्स करू शकतो, तसेच पदवीनंतरही या कोर्सला प्रवेश घेता येतो. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर कमी खर्चात उच्च पदांवर काम करण्याची संधी उपलब्ध होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमात कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष स्वप्नील पाटोळे यांनी सांगितले की, पश्चिम महाराष्ट्रात सीएस व्यवसायाचा अधिकाधिक प्रसार व्हावा आणि विद्यार्थ्यांना तसेच सदस्यांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती.

या वेळी सीएस जयदीप पाटील, ज्योतिबा गावडे, सचिन बिडकर, प्रवीण निंगोरे, अमित कुमार, शाहिद महाबरी आदी उपस्थित होते.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande