
जळगाव , 14 एप्रिल (हिं.स.) एकेकाळी ‘गरिबांचे अन्न’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्वारीने आता भाव खाल्ला आहे. गेल्या हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारीचे उत्पादन घटल्याने बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक कमी झाली आहे.
परिणामी, ज्वारीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून भाकरी महाग झाली आहे, तर गव्हाच्या तुलनेत पोळी तुलनेने स्वस्त राहिली आहे स्थानिक बाजारपेठेत सध्या ज्वारीच्या दरात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः चविष्ट आणि पौष्टिक मानल्या जाणाऱ्या मालदांडी ज्वारीला अधिक मागणी असून तिचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. गेल्या महिन्यांच्या तुलनेत ज्वारीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरावर याचा परिणाम जाणवत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, ज्वारीला नेहमीच मोठी मागणी असते. मात्र यंदा उत्पादन घटल्यामुळे बाजारात पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे दरात चढ-उतार होत असून सध्या ज्वारीचे भाव २५०० ते ५५०० हजार रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गहू आणि तांदळाच्या तुलनेत ज्वारी महाग झाल्याने ग्रामीण भागातही भाकरीचा खर्च वाढला आहे. येत्या हंगामात उत्पादन वाढल्यास दरात काहीशी स्थिरता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर