कोल्हापूर : खंडणीसाठी अपहरण करून व्यावसायिकाची हत्या
कोल्हापूर, 14 एप्रिल (हिं.स.) : शिरोळ तालुक्यातील दानोळी येथील तरुण व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा (वय ४०) यांचे अपहरण करून २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्यानंतर त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भ
प्रतिकात्मक लोगो


कोल्हापूर, 14 एप्रिल (हिं.स.) : शिरोळ तालुक्यातील दानोळी येथील तरुण व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा (वय ४०) यांचे अपहरण करून २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्यानंतर त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. १३) रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी भरतेश टोपगोंडा यांचे अपहरण केले. अपहरणानंतर त्यांच्या मोबाईलवरूनच त्यांच्या चुलत भावाला फोन करून २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. रक्कम घेऊन येण्यासाठी एक ठिकाणही सांगण्यात आले होते.

चुलत भावाने एका व्यक्तीसोबत ठरलेल्या ठिकाणी रक्कम घेऊन पोहोचले, मात्र तेथे कोणीही आढळले नाही. त्यानंतर त्यांनी भरतेश यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. मात्र सुरुवातीला पोलिसांनी ‘मिसिंग’ची नोंद घेत पुढील कारवाई उशिरा करण्याचे सांगितल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली.

यानंतर ग्रामस्थांनी पोलीस पाटील प्रशांत नेजकर यांच्या नेतृत्वाखाली स्वतःच शोधमोहीम सुरू केली. शोधादरम्यान शेरीमळा रस्त्यावर उसाच्या शेतात भरतेश यांची गाडी व चप्पल आढळून आली. त्याच ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीचा मफलर आणि नाईट बूटही सापडले. घटनास्थळी झटापट झाल्याचे स्पष्ट दिसून आले.

घटनास्थळापासून अवघ्या १०० फूट अंतरावर मंगळवारी (दि. १४) दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास, भरतेश यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या ओठांवर व तोंडावर मारहाणीच्या खुणा असल्याने अपहरणकर्त्यांनी त्यांचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, डीवायएसपी ठाकूर आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वेळीच कारवाई झाली असती तर भरतेश यांचा जीव वाचला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande