
बीड, 14 एप्रिल (हिं.स.) गोव्यात पार पडलेल्या राष्ट्रकुल संसदीय संघ (CPA) भारत क्षेत्र – ७ (पश्चिम विभाग) वार्षिक परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि शिकण्याचा समृद्ध अनुभव देणारी बाब ठरली. असे आमदार नमिता मुंदडा यांनी सांगितले
या परिषदेत गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांतील मान्यवर संसदीय प्रतिनिधींसमवेत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्याची संधी लाभली.
“विकसित भारत – २०४७” या ध्येयाकडे वाटचाल करताना विधिमंडळातील युवा सदस्यांची भूमिका काय असावी, तसेच व्यापार, पर्यटन, नागरीकरण, पर्यावरण आणि तटीय संपर्कयंत्रणा यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रादेशिक स्तरावर कोणते प्राधान्यक्रम असावेत, यावर व्यापक विचारमंथन झाले. या चर्चांमुळे आगामी काळातील धोरणात्मक दिशादर्शक बाबींबाबत स्पष्टता मिळाली.देशभरातील मोजक्या निवडक आमदारांमध्ये या परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळाली, याचा मला विशेष अभिमान वाटतो. या व्यासपीठावरून मिळालेल्या अनुभवाचा उपयोग आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आणि प्रभावी जनप्रतिनिधित्वासाठी नक्कीच करणार आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis