
जळगाव, 14 एप्रिल, (हिं.स.) जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारूच्या नशेत असलेल्या एका तरुणाने गावातील रस्त्यावर काचेच्या बाटल्या फोडून नागरिकांसाठी मोठी अडचण निर्माण केली. या प्रकारामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी काचा पसरल्याने वाहनधारक आणि ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागला.
पळासखेडा येथे संबंधित मद्यपी तरुणाने कोल्ड्रिंकच्या सुमारे २० ते २५ बाटल्या रस्त्यावर फोडल्या. त्यामुळे संपूर्ण रस्ता काचांनी झाकला गेला होता. या घटनेमुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती आणि अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याच दरम्यान, राज्याचे मंत्री गिरीश महाजन हे कार्यक्रमानिमित्त पळासखेडा गावात आले होते. गावात प्रवेश करताना रस्त्यावर पसरलेल्या काचा पाहून ग्रामस्थांनी त्यांचा ताफा थांबवला आणि संपूर्ण प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. घटनेची गंभीरता लक्षात घेत मंत्री गिरीश महाजन यांनी तत्काळ कारवाई करत संबंधित तरुणाला जागीच धडा शिकवला. त्यांनी त्या तरुणाला स्वतः झाडू मारून रस्त्यावर पसरलेल्या काचा स्वच्छ करण्यास भाग पाडले. संपूर्ण रस्ता स्वच्छ होईपर्यंत त्याला तेथेच ठेवण्यात आले. यानंतर रस्ता पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतरच त्या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तात्काळ कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली.या घटनेनंतर नागरिकांकडून मंत्री गिरीश महाजन यांच्या तत्परतेचे कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांकडून संबंधित तरुणाविरोधात पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर