
बीड, 14 एप्रिल (हिं.स.)। राज्यात पशुधनावर आधारित उद्योजकता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. आता या योजनेत मुरघास संयंत्र वाटपासाठी वैयक्तिक लाभार्थ्यांसोबतच शेतकरी गट आणि संस्थांचा समावेश करण्यात आला असून वराह पालनालाही विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात शाश्वत चारा उपलब्धता आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने शासनाने हा सुधारित निर्णय प्रसिद्ध केला आहे.
नव्या निर्णयानुसार शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांना ५० टक्के ते ७५ टक्के अनुदानावर या योजनांचा लाभ घेता येईल. वराह पालनासाठी २.०८ लाख रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित असून त्यात विमा आणि पायाभूत सुविधांचा समावेश आहे. विशेष म्हणजे वराह पालनासाठी आता ४ टक्के व्याज सवलत योजनाही लागू करण्यात आली आहे. महिलांसाठी ५० टक्के आरक्षण ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis