नाशिक - पाणीपुरवठ्यावरून महापौर, उपमहापौर प्रशासनावर नाराज; सुनावले खडे बोल
नाशिक, 14 एप्रिल (हिं.स.)।- शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटींचा आढावा घेण्यासाठी महापौरांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. शहरात मनपामार्फत पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या असल्या तरी वितरण व्यवस्था अद्याप सुरळीत नसल्याबद्दल महापौर आणि उपमहापौरांन
नाशिक - पाणीपुरवठ्यावरून महापौर, उपमहापौर प्रशासनावर नाराज; सुनावले खडे बोल


नाशिक, 14 एप्रिल (हिं.स.)।- शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटींचा आढावा घेण्यासाठी महापौरांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. शहरात मनपामार्फत पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या असल्या तरी वितरण व्यवस्था अद्याप सुरळीत नसल्याबद्दल महापौर आणि उपमहापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अनुभवी व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. यावर उपाय म्हणून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेण्यासाठी १७तारखेपर्यंत विशेष बैठक आयोजित करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

मनपाच्या प्रस्तावित १७पाण्याच्या टाक्यांपैकी १० टाक्यांचे काम पूर्ण झाले असून, त्यापैकी एका टाकीला गळती लागल्याचे समोर आले आहे. निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

तसेच, ज्या कंत्राटदारांच्या कामामुळे पाइपलाइनचे नुकसान होऊन पाणीगळती होते, त्यांच्याकडून पाचपट अधिक नुकसानभरपाई वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले. पाणीपुरवठा विभागाच्या 'ना हरकत प्रमाणपत्रा' शिवाय संबंधित कंत्राटदारांचे बिल अदा करू नये, असेही स्पष्ट आदेश देण्यात आले. मे महिन्यापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा महापौरांनी दिला.

बैठकी दरम्यान महापौरांनी अधिकाऱ्यांना जाब विचारताना तीव्र शब्दांत सुनावले, तुम्हाला रात्रीच्या झोपा कशा लागतात.....? असा सवाल करत त्यांनी प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली. महापौरांच्या या कठोर भूमिकेमुळे पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यास गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande