
पुणे, 14 एप्रिल (हिं.स..) : समाजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघााबाबत मोठ्या प्रमाणात स्पष्टता निर्माण होत असून, संघाला जवळून आणि त्याच्या दृष्टीकोनातून समजून घेणे आवश्यक असल्याचे मत संघाचे सहप्रचार प्रमुख नरेंद्र कुमार ठाकूर यांनी व्यक्त केले. भारताला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवण्याच्या ध्येयाने संघ कार्यरत असून, प्रत्येक नागरिकाने या राष्ट्रनिर्मितीत आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कसबा भाग प्रचार विभागातर्फे आयोजित ‘संघ शताब्दी मंथन’ कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी कसबा भाग संघचालक प्रशांत यादव, कार्यवाह राहुल पुंडे यांची उपस्थिती होती.
संघाची शाखा ही केवळ व्यायामाचे ठिकाण नसून ती संस्कारांचे केंद्र असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. शाखेत येणाऱ्या स्वयंसेवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच राष्ट्रभक्ती, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची भावना विकसित केली जाते. शिक्षण, आरोग्य, सेवा आणि ग्रामविकास अशा विविध क्षेत्रांत स्वयंसेवक सक्रियपणे कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
वनवासी कल्याण आश्रम, विद्या भारती आणि सेवा भारती यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. स्वयंसेवकांचा दृष्टिकोन ‘स्वार्थ’ नसून ‘परमार्थ’ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
आपत्तीच्या काळात, भूकंप किंवा महापूर असो, संघाचे स्वयंसेवक कोणतीही प्रतीक्षा न करता मदतीसाठी धावून जातात. मदत करताना जात, धर्म किंवा पंथ न पाहता केवळ ‘माणूस’ म्हणून सेवा केली जाते, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.
संघाचे कार्य हे केवळ हिंदू समाजाचे संघटन करण्यापुरते मर्यादित नसून, त्या संघटित शक्तीच्या माध्यमातून राष्ट्राला परमवैभवाकडे नेण्याचे आहे. या कार्यात प्रत्येकाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सिमंतिनी वझे यांनी ‘पंच परिवर्तन’ संकल्पनेचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समर्थ जोशी यांनी केले, तर सूत्रसंचालन अमोघ वैद्य यांनी केले.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु