कांदा गडगडला; शेतकरी संघटना आक्रमक
निफाड, 14 एप्रिल (हिं.स.)। लाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बेभावात कांदा विकल्यानंतर आता उन्हाळ कांदा मार्केटमध्ये येऊन पोहोचला आहे. मात्र, लाल कांद्याप्रमाणेच उन्हाळ कांदा सुरुवातीलाच गडगडला. बाजार समित्यांमध्ये ५०० ते ८०० रुपयापर्यंत उन्हाळ कांदा
कांदा गडगडला; शेतकरी संघटना आक्रमक


निफाड, 14 एप्रिल (हिं.स.)।

लाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बेभावात कांदा विकल्यानंतर आता उन्हाळ कांदा मार्केटमध्ये येऊन पोहोचला आहे. मात्र, लाल कांद्याप्रमाणेच उन्हाळ कांदा सुरुवातीलाच गडगडला. बाजार समित्यांमध्ये ५०० ते ८०० रुपयापर्यंत उन्हाळ कांदा विकला जात असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

कांदा पिकासाठी मोठा खर्च करून हातात काही मिळत नसल्याने कांदा उत्पादक हातबल झाला आहे. महागडी बियाणे, लागवडीचा मोठा खर्च, काढणीचे गगनाला भिडलेले भाव, खते व कीटकनाशकांच्या किमतीत झालेली भरमसाट वाढ यामुळे कांदा उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली. जवळपास पंधरा ते वीस टक्के मागील वर्षाच्या तुलनेत कांदा उत्पादनासाठी खर्च वाढला. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत कांद्याचे भाव १५ ते २० टक्क्यांनी घसरल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मागील वर्षी किमान ९०० ते १००० रुपये दर कांद्याला मिळत होता. चालू वर्षी मात्र ५०० रुपयांपासूनच सुरुवात झाली. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून कांद्याची लागवड केली. याशिवाय शेतकऱ्याची उधारी मोठी आहे, अशा परिस्थितीत कांदा साठवण करणे अनेक शेतकऱ्यांना शक्य नाही. अशा परिस्थितीत कांदा विकणे गरजेचे वाटत आहे. मात्र खर्च अफाट उत्पादन अल्प अशी परिस्थिती असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. अशा परिस्थितीत शरद जोशीप्रणीत जिल्हा शेतकरी संघटना व शेतकरी समन्वय समिती आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने कांदा उत्पादन व भावासाठी नेमलेली समिती झोपा काढत आहे का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

चौकट

कांद्याचे प्रचंड प्रमाणात भाव गडगडले आहेत. केंद्र व राज्य सरकार मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे. किती वेळा आंदोलने करायची ? आंदोलनानंतरही सरकारला जाग येत नाही.

- अर्जुन बोराडे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande