अमरावती : नराधम आरोपीला 21 पर्यंत पोलीस कोठडी
तरुणींचे लैंगिक शोषण व व्हिडीओ व्हायरलचे प्रकरण अमरावती, 14 एप्रिल (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर-परतवाडा शहरातील मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी पोलिसांनी आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद याला अटक केली आहे. त्याच्यावर अनेक तरुणींच्या लैंगिक
कोर्टाचा लोगो


तरुणींचे लैंगिक शोषण व व्हिडीओ व्हायरलचे प्रकरण

अमरावती, 14 एप्रिल (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर-परतवाडा शहरातील मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी पोलिसांनी आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद याला अटक केली आहे. त्याच्यावर अनेक तरुणींच्या लैंगिक शोषणासह या तरुणींचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल केल्याचा आरोप आहे. सदर आरोपीला कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याला 21 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार परतवाडा परिसरात काही मुलींचे आणि एका तरूणाचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. आरोपी अयान अहमद याने विविध मुलींशी ओळख वाढवून त्यांच्या इच्छेविरूद्ध अश्लील चित्रीकरण केले आणि ते फोटो-व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर परतवाडा पोलिसांनी आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद याला अटक केली. आज दुपारी आरोपी अयान अहमद याला अचलपूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असून त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणात महाराष्ट्र सायबर विभागाने समाज माध्यमांवरील प्रसारित व्हिडिओ, फोटो हटविण्याचे काम सुरू केले आहे. ज्यांनी हे व्हिडिओ डाउनलोड केले, त्यांच्याकडून ते पुन्हा समाज माध्यमांवर प्रसारित होण्याचा धोका आहे. पोलीस अशा पोस्टवर नजर ठेवून आहे, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली आहे.

बदनामीच्या भीतीपोटी अद्याप कोणतीही पीडित मुलगी किंवा तिचे पालक तक्रार देण्यासाठी पुढे आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलिसांनी पीडित कुटुंबीयांना सहकार्याचे आवाहन केले आहे. पीडित मुलींची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. त्यांना समुपदेशनासह सर्व कायदेशीर मदत दिली जाईल, तरी अशा प्रवृत्तींना शिक्षा होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande